
सर्जेराव देशमुख : वारजे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन आंबेडकर चौक ते वारजे हायवे चौक या मार्गावर वाहनांसाठी स्वतंत्र उड्डाणपूल तसेच त्यावरून मेट्रो धावेल असा दुमजली (डबल-डेकर) उड्डाणपूल उभारण्याची मागणी नगरसेविका तेजश्री महेश पवळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली. या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन मोहोळ यांनी दिले.
नगरसेविका तेजश्री पवळे यांनी सादर केलेल्या निवेदनात पौड फाटा ते वनदेवी दरम्यान उभारण्यात येत असलेल्या दुमजली उड्डाणपुलाचा विस्तार करून कै. नानासाहेब बराटे उड्डाणपुलावरून मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या आराखड्यानुसार हिंगणे होम कॉलनी परिसरातील सुमारे १८ घरे बाधित होण्याची शक्यता असून, पर्यायी आराखडा स्वीकारल्यास नागरिकांची घरे वाचतील, अनावश्यक भूसंपादन टळेल आणि शासनाचाही खर्च कमी होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याशिवाय आंबेडकर चौक ते वारजे हायवे चौक या मार्गावर भविष्यातील वाहतुकीचा विचार करून वाहनांसाठी स्वतंत्र उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो मार्गासह दुमजली उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल तसेच पुणे शहराला दीर्घकालीन आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.नागरिकहित, शहराचा नियोजनबद्ध विकास आणि भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती नगरसेविका पवळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार यांच्याकडे केली आहे.
