
सर्जेराव देशमुख : डेक्कन पोलिसांनी घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत फिर्यादीच्या घरातील सुमारे ३० लाख रुपये किमतीचे २० तोळे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या घरगडीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, जनवाडी येथील रहिवासी फिर्यादी यांच्या घरात काम करणारा शहाजी लक्ष्मण ढोबळे (वय ५१) याने घरातील कपाटातून अंदाजे २० तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने, एकूण सुमारे ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
गुन्ह्याचा तपास करत असताना डेक्कन पोलिसांच्या तपास पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने जप्त करून फिर्यादीचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) कृष्णकांत राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजाल मुल्ला व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सपना देवळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अजय मोसले तसेच पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, सचिन गायकवाड, प्रशांत पवार, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, महेश काळे, संजय दंडगुळे, स्वप्निल गायकवाड व महिला पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर यांनी सहभाग घेतला.
