पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ची कर्नाटकात कारवाई; आरोपी बंगळुरूमध्ये बदलत होता ठिकाण

सर्जेराव देशमुख : खुनाच्या गुन्ह्यासह मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने कर्नाटकातून जेरबंद केले. मोईनुद्दीन जाफर शेख ऊर्फ मोईन कालू शेख (वय २८, रा. बेंरेघाट रोड, बॉस मिको जवळ, राज लेआउटजवळ, बंगळुरू, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त गौहर हसन, तसेच सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आरोपीविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५००/२०२२ अन्वये भारतीय दंड विधानातील कलम ३०२, ३४ सह आर्म्स अॅक्ट तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. युनिट-४ पथकातील पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, सहायक पोलिस फौजदार प्रवीण राजपूत, पोलिस हवालदार अमजद शेख, तुषार खराडे आणि अनिकेत भोसले यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी कर्नाटक राज्यात असल्याची माहिती मिळाली. आरोपी मोईनुद्दीन हा मागील चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो बंगळुरू तसेच कर्नाटक परिसरात वारंवार ठिकाणे बदलत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिस हवालदार अमजद शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्याचे बंगळुरू येथील ठिकाण निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.विशेष म्हणजे, आरोपीविरुद्ध २०२४ मध्ये अमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्यान्वयेही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अमली पदार्थ सेवन व विक्रीची सवय असल्याने त्याच्याकडून संबंधित पोलिस ठाणे, न्यायालय व कारागृह प्रशासनाने नोंदी घेतल्या होत्या. मात्र, प्रत्येक वेळी तांत्रिक माहिती मिळवून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता तो ठिकाण बदलत होता.
पोलिस अंमलदार अनिकेत भोसले यांनी प्रत्येक वेळी तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळवत आरोपी हा थानागुडी, कर्नाटक तसेच बंगळुरू परिसरात असल्याची माहिती पोलिसांना दिली. अखेर पथकाने बंगळुरूमधून त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने वरील दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली असल्याची माहिती समजते. आरोपीला पुढील तपासासाठी येरवडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलिस फौजदार प्रवीण राजपूत, एकनाथ जोशी, पोलिस हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, अनिकेत भोसले, जहांगीर पठाण आणि विठ्ठल वाव्हळ यांनी सहभाग घेतला.
