
सर्जेराव देशमुख : बावधन खुर्द परिसरातील सर्व्हे नंबर २२१ ते २२५ येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या तब्बल ५ आरएमसी (Ready-Mix Concrete) प्लांटवर पुणे महानगरपालिका व संबंधित प्रशासनाने संयुक्त कारवाई करून ते पूर्णपणे बंद केले व येथील अनाधिकृत बांधकामे पाडली. या धडक कारवाईत एकूण ३५,००० चौरस फूट/क्षेत्रफळ जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही आरएमसी प्लांट भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या ‘एचईआरएमएल’ (HEMRL) या संस्थेच्या ४५० मीटर अंतराच्या प्रतिबंधित व संरक्षित क्षेत्रात येत होते. तसेच या प्लांटसाठी पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आलेली नव्हती. कोणत्याही वैध परवानग्या नसताना हे प्लांट बेकायदेशीरपणे सुरू असल्याने प्रशासनाने यावर गंभीर दखल घेतली.
ही संयुक्त कारवाई बांधकाम विकास विभाग (झोन ३), अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह विभाग आणि महावितरण (MSEB) यांच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येत पार पाडली. कारवाईदरम्यान अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून प्लांटचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि प्लांट सील करण्यात आले.
शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली असून या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर आणि महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव घटनास्थळी उपस्थित होते. बांधकाम विभागाचे उपअभियंता भास्कर हांडे आणि शाखा अभियंता अजय फाले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
संरक्षण विभागाच्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या या अवैध बांधकामांवर महापालिकेने धडक कारवाई केल्यामुळे परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. नियमबाह्य कामांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
बावधनवासीयांनी प्रदूषणाच्या समस्येतून सुटका मिळावी यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर आज झालेल्या कारवाईमुळे प्रदूषणाला आळा बसेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे
