मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवर CJP ठाम; देशव्यापी आंदोलनाचा इशारा
सर्जेराव देशमुख : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि आयोजक सौरव दास व आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी IGI विमानतळावर ताब्यात घेतल्याचा दावा पक्षाने केला आहे. या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथील नियोजित आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार असल्याची घोषणा पक्षाने केली.
दिपके यांनी अटकेपूर्वी चित्रित केलेल्या व्हिडिओ संदेशातून कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिंदे यांनी केंद्र सरकारच्या कथित दडपशाहीचा निषेध करत लोकशाहीच्या रक्षणासाठी देशभरातील नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. दरम्यान, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस व केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात असून, अनेक समर्थकांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतल्याचा दावा CJPने केला आहे.
मतदार याद्यांच्या लेखापरीक्षणाची मागणी
SIR प्रक्रियेदरम्यान मतदार याद्यांमध्ये कथित फेरफार झाल्याच्या आरोपांची फौजदारी चौकशी करावी, स्वतंत्र सर्वसमावेशक लेखापरीक्षण होईपर्यंत २०२५ च्या मतदार याद्या स्थगित ठेवाव्यात आणि निवडणूक आयोगाचे घटनात्मक स्वातंत्र्य पुनर्स्थापित करण्यासाठी २०२३ चा नियुक्ती कायदा रद्द करावा, अशा प्रमुख मागण्या पक्षाने केल्या आहेत.
नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या कथित बेकायदेशीर ताब्याविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर कार्यवाही सुरू करणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले. मागण्या मान्य होईपर्यंत देशव्यापी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार CJPने व्यक्त केला आहे.
