डेपो चौक, शांतिबन चौक आणि एकलव्य कॉलेज चौकात वाहतूक नियोजनासाठी पोलिसांची पावले

सर्जेराव देशमुख: कोथरूड परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेविका रुपाली सचिन पवार आणि सहकारी नगरसेविका अल्पना वरपे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाने कोथरूड डेपो चौक, शांतिबन चौक आणि एकलव्य कॉलेज चौक येथे प्रत्यक्ष स्थळपाहणी केली.
यावेळी पोलिस निरीक्षक गवळी यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध पर्याय सुचविले. तसेच उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या. गर्दीच्या वेळेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली.
नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, प्रवासाचा वेळ वाचावा आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीत व्हावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोथरूडमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
नागरिकांच्या सोयीला प्राधान्य देत वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेविका रुपाली पवार यांनी सांगितले.

