सर्जेराव देशमुख : पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर कोथरूड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार रोहिदास ऊर्फ तेजस राजेंद्र कांबळे (वय २५, रा. फ्लॅट नं. २०४, डी विंग, श्रावणधारा वसाहत, कोथरूड, पुणे) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती (एम.पी.डी.ए.) कायद्यान्वये कारवाई करून त्यास एका वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
आरोपी रोहिदास कांबळे हा कोथरूड परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर दुखापत करणे, विनयभंग, बेकायदेशीर हत्यारे व अग्निशस्त्रांचा वापर करून धमकावणे, दंगल घडवणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारवायांमुळे सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याने त्याच्यावर प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये एमपीडीए कायद्याच्या कलम ३(२) नुसार ही स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तो श्रावणधारा वसाहत येथे आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण दत्तु घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोटे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले तसेच पोलीस अंमलदार शिंदे, खरात, सय्यद, सोनावणे, दगडे, लांडगे, वाल्मिकी, दहिफळे, शितकाल, कोळप, डोंगरे व पांढरे यांच्या पथकाने केली.
