
सर्जेराव देशमुख : पुण्यातील बावधन परिसरातील ‘रुनवाल प्लॅटिनम’ (Runwal Platinum) या इमारतीमध्ये एक धक्कादायक आणि कायद्याची उघड पायमल्ली करणारा प्रकार समोर आला आहे. या इमारतीमध्ये ‘संस्कृती शाळा’ कार्यरत असून, याच इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका चहाच्या दुकानात चहाच्या नावाखाली सर्रासपणे सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. शाळेच्याच आवारात घुमणाऱ्या सिगारेटच्या धुरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रुनवाल प्लॅटिनम इमारतीच्या तळमजल्यावर एक चहाचे दुकान आहे. या दुकानात चहापेक्षा सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचीच विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी लहान मुले व पालकांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. अशा वेळी या दुकानाबाहेर उभे राहून अनेक जण उघडपणे धूम्रपान करत असतात. एकाच इमारतीत शाळा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुकान असा विरोधाभास असल्याने विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम होत असून, निष्क्रिय धूम्रपानाचा (Passive Smoking) धोका निर्माण झाला आहे.
‘सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा’ (COTPA) नुसार, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड (सुमारे ९१ मीटर) परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे आणि धूम्रपान करणे हा दंडनीय गुन्हा आहे. मात्र, येथे तर शाळा असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरच हा प्रकार सुरू असल्याने प्रशासन आणि पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या प्रकारामुळे पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “शाळेच्याच इमारतीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणे हे अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर आहे. प्रशासनाने या दुकानावर तातडीने कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करावी,” अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांनी केली आहे. आता पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासन याप्रकरणी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
