गुलाबराव ताठे मित्र मंडळ परिसरातील प्रकार; बांधकाम विकास विभाग झोन ६ चे दुर्लक्ष

सर्जेराव देशमुख : कर्वेनगर येथील गुलाबराव ताठे मित्र मंडळ परिसरात दोन बांधकाम प्रकल्पांची कामे सुरू असून, या बांधकामांसाठी लागणारे साहित्य पदपथावर ठेवण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पादचाऱ्यांसाठी असलेला पदपथ बांधकाम साहित्याने व्यापला गेल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी रस्त्याचा वापर करावा लागत आहे.
या परिसरात दोन बांधकाम प्रकल्प सुरू असताना बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी सार्वजनिक पदपथाचा वापर केला जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरून नागरिकांना चालावे लागत असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, सार्वजनिक पदपथ अडवून नागरिकांची गैरसोय होत असताना पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन ६ कडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. दोन बांधकाम प्रकल्प सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी याची पाहणी करतात की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पदपथावरील बांधकाम साहित्य हटवावे, पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळा करावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

