
सर्जेराव देशमुख :- पूरग्रस्तांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागले असून नियमतिकरण करण्यासाठी शासनाने तीन वर्ष मुदत वाढ करून दिली आहे. नागरिकांनी याचा लाभ घेत लवकरच कार्यवाही करून घ्यावी. कागदपत्र तपासणी, कागदपत्रांची पूर्तता करणे यासाठी नागरिकांना मदत व्हावी यासाठी निवृत्त प्रांत अधिकारी यांची समिती तयार करण्यात येईल. जेणेकरून नागरिकांना मदत होईल व प्रशासकीय कामामध्ये मदत होईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. पानशेत पूरप्रस्त समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, राज्य पुनर्वसन प्राधिकरण माजी उपाध्यक्ष माधव भंडारी, नगरसेवक सुनील पांडे, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, आदित्य माळवे आदीसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पुरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि माधव भंडारी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. पाठीमागील सरकार निर्णय घेत नव्हते परंतु आपले सरकार आले त्यामुळे लवकर निर्णय घेण्यात आले व प्रश्न सुटले आहेत. सरकारने आता शेवटची मुदतवाढ केली असल्यामुळे आता आपण सर्व नागरिकांनी लवकरात लवकर ती कार्यवाही पूर्ण केली पाहिजे.
कोयनेच्या प्रकल्प ग्रस्तांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पानशेत पूरग्रस्त हा १९६१ चा विषय असून अनेक वर्ष प्रश्न सुटला नव्हता. यावर सरकारने निर्णय घेतला असून पूरग्रस्तांचे प्रश्न सुटले आहेत त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण आहे . पुणे भागातील पूरग्रस्तांचा प्रश्न सुटणे ही क्रांतिकारी घटना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे ही समस्या लवकर सुटली आहे. असे माधव भंडारी बोलले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका रत्ना दहिवेलकर यांनी केले.

