
सर्जेराव देशमुख – कोथरूड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धडक कारवाई करत निलेश घायवळ टोळीतील सराईत गुंड व विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी निलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा याला अटक केली आहे.
कोथरूड पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण व पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना, पोलीस शिपाई विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी व वैभव शितकाल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तसेच मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी निलेश उर्फ चांग्या शर्मा हा सुतार हॉस्पिटल परिसरातील मंडई भागात येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचून मंडई, सुतार हॉस्पिटल परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी आरोपी आढळून आल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
सदर आरोपी हा कोथरूड पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्हा तसेच जामखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातही पाहिजे होता. आरोपीविरुद्ध खंडणी, शस्त्र बाळगणे, संघटित गुन्हेगारी व खुनासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
