सर्जेराव देशमुख : पानशेत पुरग्रस्त समिती, पुणे शहर यांच्या वतीने शनिवार, २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथे भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या प्रमुख बैठकीत पानशेत पुरग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये पानशेत पुनर्वसनासाठी मिळालेल्या मोकळ्या जागेचे अतिक्रमण रक्कम स्वीकारून नियमतीकरण, मिळकत पत्रिकेमधील क्षेत्र इत्यादीच्या चुका दुरुस्त करणे, महसूल अभिलेखांमध्ये पुरग्रस्तांच्या मालकी हक्काची नोंद करणे आदी विषयांचा समावेश आहे.
समितीने गेल्या काही वर्षांपासून पुरग्रस्तांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला असून त्याला यश मिळाल्याने संबंधित मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, राज्य पुनर्वसन प्राधिकरणचे माजी उपाध्यक्ष माधव भंडारी तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
पानशेत पुरग्रस्तांच्या प्रश्नांवर झालेल्या कार्यवाहीची माहिती तसेच शासनाने घेतलेल्या निर्णयांचा आढावा यावेळी देण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी दिली. या कार्यक्रमाला पुरग्रस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
