
सर्जेराव देशमुख : डेक्कन पोलिस स्टेशनच्या पथकाने केलेल्या विशेष कारवाईत एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलिस अंमलदार सचिन गायकवाड व सागर घाडगे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार नवीपेठेतील भिडे पुलाजवळील मोकळ्या मैदानात संशयित व्यक्ती असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
तपासादरम्यान आरोपी श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ याची झडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल व सुमारे ५०० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपीला अटक करून डेक्कन पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीविरुद्ध यापूर्वीही डेक्कन, वाकड आणि देहूरोड पोलिस ठाण्यांत घरफोडी, चोरी व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.ही कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त पी.आर. पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलिस अंमलदार सचिन गायकवाड, सागर घाडगे, वरिष्म सिद्दीकी, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, संजय दहांगुळे आणि धनश्री सुपेकर यांनी सहभाग घेतला.
