
सर्जेराव देशमुख – कोथरूड परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करत कोथरूड पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेल्या तीन दुचाकींसह एक संशयित वाहन जप्त करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी ३ जून रोजी रात्री शिवतीर्थ नगर रोड, रोहन कॉर्नर बिल्डिंगसमोरील सार्वजनिक रस्त्यावर पार्क करून हँडल लॉक केलेली मोपेड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दिली होती.या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सुनील कारोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला.तपासादरम्यान संशयित आरोपी गुजरात कॉलनी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पियुष राम सांवत (वय १८ वर्षे), रा. जयभवानी नगर, कोथरूड याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदर गुन्ह्यासह कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १३६/२०२६ व १६६/२०२६ मधील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.आरोपीच्या कबुली जबाबानुसार चोरीस गेलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच आणखी एक संशयित वाहनही मिळून आले असून त्याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने, सुनील कारोटे, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तसेच दत्ता सोनवणे, श्रीकांत दगडे, मयूर पांढरे, ऋषिकेश कोळप, जय खरात, मंगेश शेळके, आकाश वाल्मिकी, विष्णू राठोड, वैभव शितकाल आणि शकील पठाण यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
