
सर्जेराव देशमुख : कोथरुड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ४ गावठी पिस्टल, १२ जिवंत काडतुसे आणि एक ऍक्टिवा दुचाकी असा एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलीस हवालदार शकील पठाण व संजय दहिभाते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, कमीन्स कंपनीच्या मागील बाजूस एक इसम पिस्टल बाळगून फिरत आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.पोलिसांनी संशयित निशांत रमेश सातपुते (वय २२, रा. एरंडवणे) व संकेत प्रकाश निवंगुणे (वय २४, रा. वारजे माळवाडी) यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान निशांत सातपुते याच्याकडून एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने हे शस्त्र संकेत निवंगुणे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.यानंतर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संकेत निवंगुणे याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान त्याचा साथीदार श्रवण पवार याच्याकडे आणखी शस्त्रे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी १९ जून रोजी श्रवण पवार याला शिताफीने अटक केली. त्याच्या अॅक्टिव्हाच्या डिकीतून ३ गावठी पिस्टल व ९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ पिस्टल, १२ जिवंत काडतुसे आणि एक अॅक्टिव्हा दुचाकी असा २.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घुले करीत आहेत.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे व सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
