सर्जेराव देशमुख : कोथरूड येथील सुमारे ५०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली पुणे महापालिकेची सुमारे एक एकर जागा ‘प्रज्ञिती वेल्फेअर फाउंडेशन’ या संस्थेला विनानिविदा ३० वर्षांच्या भाडेकराराने देण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत मनसेचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत हा निर्णय तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, कोथरूडमधील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली सुमारे ३६२१.३६ चौरस मीटर (सुमारे एक एकर) जागा कोणतीही खुली निविदा प्रक्रिया न राबविता एका संस्थेला देण्याचा निर्णय पारदर्शकतेच्या तत्त्वांना धरून नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.मनसेने या प्रस्तावावर अनेक आक्षेप नोंदवले असून संबंधित संस्थेला वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम चालविण्याचा सिद्ध अनुभव नसल्याचा दावा केला आहे. तसेच कोथरूडमधील स्थानिक सामाजिक व सेवाभावी संस्थांचा विचार न करता एका विशिष्ट संस्थेची निवड का करण्यात आली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोथरूड हा वेगाने विकसित होणारा परिसर असून येथे मेट्रो पार्किंग, मुलांसाठी खेळाचे मैदान आणि इतर सार्वजनिक सुविधांची गरज आहे. त्यामुळे भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेता ही जागा सार्वजनिक उपयोगासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय, यापूर्वी महापालिकेने विविध संस्थांना दिलेल्या जागांचे स्वतंत्र लेखापरीक्षण (ऑडिट) करून त्यांचा वापर कराराच्या अटींनुसार झाला आहे का, याची चौकशी करावी, तसेच संपूर्ण प्रस्ताव आणि प्रक्रिया सार्वजनिक करावी, अशीही मागणी मनसेने केली आहे.
५००मनसेने या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली असून, जागा हस्तांतरणाचा निर्णय तात्काळ स्थगित न केल्यास कोथरूडमधील नागरिकांसह तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
