सर्जेराव देशमुख : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचे कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे. कचरा संकलन व वाहतूक कामकाजात आढळून आलेल्या त्रुटी दूर करून शहराची स्वच्छता सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
परिपत्रकानुसार अनेक ठिकाणी कचरा संकलन वाहने वेळेवर पोहोचत नसल्याने, वाहनांमध्ये कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने तसेच जीपीएस प्रणालीचा योग्य वापर न झाल्याने रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व मोकळ्या जागांमध्ये कचरा साचत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शहराच्या स्वच्छतेवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांकडून तक्रारी वाढत असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.
नव्या आदेशानुसार पुढील १५ दिवस सर्व कचरा संकलन वाहनांवरील जीपीएस प्रणाली अखंड कार्यरत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सर्व वाहनांचे मार्ग (रूट) निश्चित करून त्यानुसारच कचरा संकलन करणे आवश्यक राहणार आहे. विभागप्रमुखांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही वाहनाचा मार्ग बदलता येणार नाही.याशिवाय फिडर पॉईंट ते कचरा हस्तांतरण केंद्रापर्यंत जीपीएस मार्ग निश्चित करणे, वाहनांमध्ये बिघाड झाल्यास तत्काळ वरिष्ठांना माहिती देणे, नियुक्त मार्गावरील संपूर्ण कचरा उचलणे आणि रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा साचणार नाही याची संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेने आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना दररोज जीपीएस, वाहनांची उपस्थिती आणि मार्गाचे पालन याची तपासणी करण्याचे आदेश दिले असून, आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.
